परिचय
डॉ.उषा खंदारे यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कोल्हापूर येथील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे, तर पदवी व पदव्युत्तर शिक्षण मुंबई येथे झाले. मुंबई येथील इंडियन एज्युकेशन सोसायटी या संस्थेत जवळपास १० माध्यमिक शाळांत त्यांनी काम केले.
प्रमुख केंद्रसंचालक ,शिबीर प्रमुख व तज्ज्ञ मार्गदर्शक, प्रमुख निमंत्रक,समन्वयक,राज्यस्तरीय निबंध स्पर्धा-परीक्षक, मराठी पाठ्यपुस्तक मंडळ,सदस्य "सॅक" कमिटी,सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम, केंद्र संचालक,सेन्साॅर बोर्ड सभासद अशा विविध मंडळावर त्यांनी काम केले आहे.
शैक्षणिक, चरित्रात्मक, विज्ञान, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध विषयांवर अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत.आकाशवाणी, दूरदर्शनवरील कार्यक्रमात सहभाग. सामाजिक जाणिवेतून त्यांनी अनेकवेळा विविध वर्तमानपत्रांतून पत्रव्यवहार केला असून अशी पत्रे मार्गदर्शक ठरली आहेत. विविध शाळांच्या नेत्रदीपक यशाबद्द्ल त्यांची विविध वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन या माध्यमांतून मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. पुस्तके, कथा, निबंध, कविता यामध्येही त्यांनी राज्यस्तरावर स्पृहणीय यश मिळवले आहे.विविध चर्चासत्रे व परिसंवादामधून सक्रीय सहभाग. विज्ञान प्रदर्शन, ग्रंथप्रदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन प्रदर्शन, लोकसंख्या शिक्षण प्रदर्शन, साहित्य प्रदर्शन अशा विविध विषयांवर आधारित त्यांनी प्रदर्शने भरवून विद्यार्थ्यांना अधिक पूरक ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे.
खो-खो,कबड्डी,क्रिकेट (मुलींसाठी) अशा विविध क्रीडा स्पर्धेत विद्यार्थी शिक्षक यांना प्रोत्साहन देऊन विविध शाळांनी प्रथम क्रमांकाची बक्षिसे अनेकवेळा प्राप्त केली आहेत.विविध क्रीडा स्पर्धांत जास्तीत जास्त विद्याथ्यांनी भाग घेऊन जे नॆपुण्य दाखवले व विजय संपादन केला त्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून काही शाळांना अनेकवेळा गौरव प्राप्त झाला आहे. शिवाय १५०००/- रुपयांचे विशेष अनुदानही मिळाले आहे. त्यांच्याच कारकीर्दीत ८ विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीतील समावेश ,६० विद्यार्थ्यांना मिळालेले माध्यमिक शिष्यवॄत्ती परीक्षेतील नेत्रदीपक यश , ५ विद्यार्थ्यांना N.T.S शिष्यवॄत्ती , २ विद्यार्थ्यांना बालश्री (राष्ट्रपती पदक) अशी उल्लेखनीय कामगिरी होय.
विधानसभेचे कामकाज, नेहरु सायन्स सेंटर ,विविध आश्रमशाळा भेट, कमला मेहता अंधशाळा, माहीम नेचर पार्क, आकाशदर्शन, आदिवासी भागास भेट, कुष्ठरोग्यांची माहिती, हाफ़किन इन्स्टिट्यूट, निसर्ग ठिकाणे, ऎतिहासिक ठिकाणे, तीर्थक्षेत्रे या ठिकणी शैक्षणिक सहली आयोजित करुन विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव निर्माण होण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.याशिवाय मातृदिन, गुरु गौरव दिन,जागतिक लोकसंख्या वाढ इशारा दिन- ११ जुलै , राष्ट्रीय विज्ञान दिन , मराठी भाषा दिवस आणि इतर ,विशेषदिन,परिसर अभ्यास,काव्यगायन यासारख्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विज्ञानमंडळ, निसर्गमंडळ, मराठी वाड:मय मंडळ, क्रीडामंडळ अशी विविध मंडळे स्थापन करुन विद्यार्थ्याना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. विविध संस्था, मान्यवर व्यक्ती, माजी विद्यार्थी यांच्याकडून शाळेस अनेकवेळा देणगी व शालोपयोगी वस्तू मिळवून दिल्या आहेत.
आदर्श शिक्षिका ,आदर्श मुख्याधापिका म्हणून त्यांना विविध संस्ठांकडून सन्मानपत्रे,स्मृतिचिन्हे, प्रशस्तीपत्रक, मानपत्रे, सन्मानचिन्हे मिळाली आहेत. शिक्षणातील आव्हाने, महाराष्ट्र भूषण आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फ़ुले या पुस्तकांनाही पुरस्कार मिळाले आहेत. मनुष्यबळ विकास लोकसभा अकादमी व इन्फ़ोटेक फ़िचर्स संयोजित शैक्षणिक क्षेत्रात प्रशंसनीय कार्य केल्याबद्द्ल Pride of Nation Award-2006 महाराष्ट्र गुणीजन रत्नगौरव पुरस्कार प्राप्त. भारतीय एकता प्रतिष्ठान तर्फ़े राष्ट्रीय सामाजिक एकता गौरव पुरस्कार व साहित्य स्पंदन पुरस्कार मां. आहिल्याबाई स्त्री रत्न सन्मान सेवा कलाश्री, पुरस्कार प्राप्त.
अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान, ठाणे या संस्थे तर्फ़े कला, संस्कृती व शिक्षण या विविध क्षेत्रातील योगदानाबद्द्ल जीवनगौरव पुरस्कार प्राप्त. आखिल भारतीय दलित साहित्य अकादमी,दिल्ली या संस्थेतर्फ़े व एकता कल्चरल अकादमी या संस्थेतर्फ़े सावित्रीबाई फ़ुले स्मृती पुरस्कार प्राप्त. त्यांच्या या विस्तृत कार्याची ओळख राज्य शासनानेही घेतली आणि महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.